Vijayapura

कुंभमेळा दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; विजापूर सायबर पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

Share

प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची हेलिकॉप्टर बुकिंगच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार विजापूरमध्ये उघडकीस आला आहे. एका भाविकाला ४ लाखांहून अधिक रुपयांना लुटणाऱ्या टोळीवर विजापूर सायबर पोलिसांनी कारवाई करत त्यांचे बँक खाते गोठवले आहे.

विजापूर शहरातील रहिवासी असलेल्या हणमंत तलवार यांनी प्रयागराज विमानतळावरून कुंभमेळा स्थळापर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टरचे तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला. ‘जेट सर्व्हे एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या बनावट वेबसाइटवरून त्यांनी एका तिकिटासाठी १ लाख ८ हजार आणि निवासासाठी १ लाख २१ हजार रुपये भरले. अशा प्रकारे विविध व्यवहारांतून त्यांची एकूण ४ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक झाली, असे हणमंत तलवार यांनी सांगितले.

प्रयागराजला जाण्यासाठी होणारी गर्दी पाहून हणमंत तलवार यांनी सोशल मीडियावरील जाहिरात पाहून हेलिकॉप्टर बुकिंगचा निर्णय घेतला होता. पैसे ट्रान्सफर होईपर्यंत आरोपींनी योग्य प्रतिसाद दिला, मात्र रक्कम जमा होताच तिकीट न देता संपर्क तोडला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. पोलिसांनी संबंधित बँक खाते गोठवून तक्रारदाराची रक्कम परत मिळवून दिली आहे, अशी माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.

फसवणूक करणारे लोक सक्रिय असून भाविकांनी अशा आमिषांना बळी पडू नये आणि अधिकृत वेबसाइटवरूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tags: