Belagavi

मार्केट पोलीस स्थानक ते कीर्ती हॉटेल दरम्यानचे बॅरिकेड्स हटवा

Share

बेळगावमधील ओल्ड पीबी रोडवर पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सविरोधात स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत व्यापाऱ्यांनी आणि रहिवाशांनी आपल्या समस्या मांडत बॅरिकेड्स त्वरित हटवण्याची मागणी केली.

बेळगाव शहरातील मार्केट पोलीस स्थानक ते कीर्ती हॉटेल दरम्यान लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे शेट्टी गल्ली आणि चव्हाट गल्लीतील प्रवेश बंद झाला आहे. यामुळे वाहनधारकांना सिग्नलला ताटकळत उभे राहून मोठा वळसा घालावा लागत असून, या समस्यांबाबत स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आमदार आसिफ सेठ यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

या भागात आपला व्यवसाय असून आपण चव्हाट गल्लीचे रहिवासी आहोत. दिव्यांग असल्याने बॅरिकेड्समुळे लागणारा मोठा वळसा अत्यंत त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे हे अडथळे तातडीने हटवण्यात यावेत, अशी मागणी एका दिव्यांग रहिवाशाने केली.

या भागात तीन नगरसेवक असतानाही बॅरिकेड्स लावण्यापूर्वी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. पादचारी, विद्यार्थी आणि दुचाकीधारकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असून हे बॅरिकेड्स त्वरित हटवावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली.

बॅरिकेड्स अत्यंत चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले असून तेथे कसलीही दिशादर्शक चिन्हे नाहीत. आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका आली तर तिने मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न उपस्थित करत चारही गल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणीही स्थानिकांनी केली.

नागरिकांनी बॅरिकेड्स संदर्भात आपल्या समस्या मांडल्या असून, या समस्येबाबत संबंधित पोलीस विभागाशी चर्चा करून आपण योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले.

कीर्ती हॉटेल ते बस स्थानकापर्यंत लावलेल्या बॅरिकेड्समुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास होत असून विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. प्रत्येक गल्लीच्या प्रवेशाजवळ बॅरिकेड्स बाजूला करून दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी मार्ग सोडावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Tags: