Dharwad

मनरेगा वाचवण्यासाठी धारवाडमध्ये काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Share

केंद्र सरकारने मनरेगा योजनेचे नाव बदलून ‘व्हीबीजी-राम-जी’ केल्याच्या निषेधार्थ धारवाडमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला. केंद्रातील भाजप सरकार गरीब कामगारांच्या हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप करत यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली.

धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामीण जिल्हा काँग्रेस आणि कर्नाटक नागरी पाणीपुरवठा व सांडपाणी मंडळाच्या अध्यक्षा शिवलीला कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत आणि भजन गाऊन आपला निषेध नोंदवला. मनरेगाच्या नियमानुसार कोणत्याही कामात मध्यस्थ किंवा कंत्राटदारांना वाव नसावा. मात्र, केंद्र सरकार यंत्रसामग्रीचा वापर वाढवून कंत्राटदारांना झुकते माप देत आहे, ज्यामुळे कामगारांच्या हक्काचे पैसे कंत्राटदारांच्या खिशात जात आहेत, अशी टीका यावेळी करण्यात आली.

या योजनेचे मूळ स्वरूप बदलून ते केवळ तांत्रिक आणि कंत्राटी पद्धतीचे करण्याचा सरकारचा डाव आहे. यामुळे ‘गरिबांची योजना’ ही ‘श्रीमंतांच्या फायद्याची योजना’ बनत आहे. कामांमध्ये कंत्राटदारांचा प्रवेश पूर्णपणे बंद करावा, यंत्रांऐवजी केवळ मानवी श्रमाला प्राधान्य द्यावे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून स्थानिक गरिबांना थेट काम द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. केंद्र सरकारने आपले जनविरोधी धोरण सोडून कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Tags: