Belagavi

अश्लील व्हिडिओ प्रकरणी सरकारकडून दोषी अधिकाऱ्यांची पाठराखण

Share

एडीजीपी रामचंद्र राव यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर बेळगावमध्ये बोलताना आमदार अभय पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओचा संदर्भ देत अभय पाटील यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त केला. सरकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारचे अनैतिक प्रकार घडणे हे अत्यंत खेदजनक आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभे राहत असून, त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचे त्यांनी म्हटले. हे सरकार भ्रष्ट आणि नैतिक मूल्ये नसलेल्या अधिकाऱ्यांना संरक्षण देत असून, कोणाचेही नाव समोर आले तरी कारवाई करण्याचे धैर्य सरकारमध्ये नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सत्य काय आहे हे स्पष्टपणे समोर येत आहे, तरीही सरकार यावर मौन बाळगून असणे ही शोकांतिका आहे. विशेषतः महिलांनी या सरकारच्या भूमिकेबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उघडपणे पुरावे असूनही जर व्यवस्था कारवाई करत नसेल, तर आता जनतेनेच याचा निर्णय घ्यावा. राज्य सरकार जाणीवपूर्वक चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहत असून, जनतेचा विश्वास गमावत असल्याची प्रतिक्रिया आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केली.

Tags: