मराठी द्वेषाची परंपरा कायम ठेवत कित्तूर कर्नाटक सेनेने पुन्हा एकदा बेळगावातील मराठी नेतृत्वावर आणि शाळांवर निशाणा साधला आहे. सीमाभागात नेहमीच मराठी भाषिकांच्या हक्कासाठी लढणारे समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर ‘गुंडा ॲक्ट’ लावून त्यांना हद्दपार करावे, अशी चिथावणीखोर मागणी या संघटनेने शनिवारी आंदोलनादरम्यान केली.

सीमाभागात कन्नड शाळांना प्राधान्य देऊन नवीन इमारती बांधण्याची मागणी करतानाच, ज्या शाळांची पडझड झाली आहे किंवा ज्यांचे विलीनीकरण झाले आहे, त्या शाळांच्या जागी तातडीने व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागणीच्या आड मराठी शाळांच्या अस्तित्वावर गदा आणण्याचा छुपा अजेंडा असल्याची चर्चा मराठी वर्तुळात रंगली आहे.
याचबरोबर शहरातील आरपीडी कॉलेजसमोरील रिकाम्या चौकाला राजा वीर मदकरी नायक यांचे नाव देऊन तिथे पुतळा बसवावा, तसेच इम्मडी पुलकेशी यांचा ४० ते ६० फुटांचा भव्य पुतळा मुख्य चौकात उभारावा, याशिवाय अमटूर बाळप्पा आणि बेलवडी मल्लम्मा यांचे पुतळे उभारून विविध ठिकाणांना त्यांची नावे देण्याची मागणी सदर संघटनेने केली आहे.
कित्तूर कर्नाटक सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष महेश शिगीहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात एकूणच सीमाभागातील शांतता बिघडवून मराठी भाषिकांसह प्रशासकीय यंत्रणेला वेठीला धरत या संघटनेने पुन्हा वळवळ सुरु केल्याचे दिसून येत आहे.


Recent Comments