बेळगावमधील भाग्यनगर येथील मुक्तांगण विद्यालयात पाही व्हाइब्स फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींसाठी ‘हॅलो पीरियड्स’ या विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे किशोरवयीन मुलींना आरोग्याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.


सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि पोरवाल ट्युटर्सच्या संस्थापक डिंपल पोरवाल व सिल्कू पोरवाल यांनी या सत्रात साधन व्यक्ती म्हणून सहभाग घेतला. त्यांनी ८ ते १२ वर्षे वयोगटातील सुमारे ७७ विद्यार्थिनींशी संवाद साधला. ऋतुचक्राबाबत समाजात असलेले चुकीचे समज दूर करून या काळात वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता जे. के. आणि शिक्षक वृंदाने मोलाचे सहकार्य केले. पाही व्हाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका रक्षा यु. आणि सदस्या मेघा दुदामी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या संवादामुळे विद्यार्थिनींमधील संकोच दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
विविध सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या पोरवाल भगिनींच्या कार्याचे फाउंडेशनने यावेळी विशेष कौतुक केले. येणाऱ्या काळात समाजातील मुली आणि महिलांसाठी अशाच प्रकारचे अधिक उपयुक्त व आरोग्यदायी शिबिरे आयोजित करण्याचा मानस फाउंडेशनने व्यक्त केला आहे.


Recent Comments