संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी १७ जानेवारी रोजी बेळगावात ‘हुतात्मा दिन’ पाळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक रंगुबाई पॅलेस येथे पार पडली.

या बैठकीत पोलिसांनी फेरीला परवानगी दिली तरी किंवा नाकारली तरी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने हुतात्मा चौकात जमावे, असा ठाम निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर बोलताना म्हणाले, “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईपासून बेळगावपर्यंत अनेक वीर हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून १७ जानेवारीला सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून हुतात्मा दिन पाळावा. सकाळी ९:३० वाजता हुतात्मा चौकात सर्वांनी एकत्र यावे. दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नी म्हणावे तसे सहकार्य मिळत नाहीये. कर्नाटक सरकार ज्याप्रमाणे कासरगोडच्या प्रश्नावर ठाम आहे, तशी भूमिका महाराष्ट्र सरकार घेत नाही. कन्नड संघटनांचा उपद्रव वाढला असून, त्याला आवर घालण्यासाठी २१ जानेवारीनंतर विशेष बैठक घेऊन विराट मोर्चाचे नियोजन केले जाईल.”
शहर समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे बोलताना म्हणाले: “सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. २१ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीसाठी आम्ही वकिलांच्या संपर्कात आहोत. मात्र, महाराष्ट्र सरकारचे या विषयाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तरीही आम्ही आमचा लढा सोडणार नाही. हुतात्मा दिनाच्या फेरीसाठी प्रशासनाकडे अर्ज केला आहे, त्यांनी परवानगी दिली तरी किंवा न दिली तरी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी फेरी निघणारच, हे निश्चित आहे.”
युवा नेते शुभम शेळके म्हणाले: “हुतात्म्यांना आदरांजली वाहणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सीमाप्रश्न संपल्याचे चुकीचे वक्तव्य केले होते. कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता, त्यांनी अशा कोणत्याही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मराठी भाषेच्या सन्मानासाठी आम्ही लवकरच ‘मराठी सन्मान यात्रा’ काढणार आहोत. सीमावासियांनी खचून न जाता एकजुटीने या लढ्यात सहभागी व्हावे.”
या बैठकीला रणजीत चव्हाण-पाटील, श्रीकांत कदम, ॲड. अमर येळ्ळूरकर, रमाकांत कोंडुसकर यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments