Belagavi

बेळगावात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न

Share

बेळगावात छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने धर्मवीर संभाजीराजेंचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७ वाजल्यापासूनच स्मारक परिसरात शिवप्रेमींची मोठी गर्दी जमली होती.

कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकास दुग्धाभिषेक घालून आणि विधिवत पूजा करून झाली. त्यानंतर नगरसेवक जयतीर्थ सौन्दती आणि सुनील जाधव यांच्या हस्ते स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी संपूर्ण परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, “१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक झाला होता. वयाच्या ३२ व्या वर्षी १२८ युद्धे जिंकणाऱ्या शंभूराजांचा इतिहास खरोखर सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण २०१ लढाया लढल्या आणि एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. अशा थोर राजाचा आदर्श आजच्या पिढीने समोर ठेवला पाहिजे.”

स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “जगावे कसे हे शिवरायांनी शिकवले, तर स्वराज्य आणि स्वधर्मासाठी मरावे कसे हे शंभूराजांनी आपल्या बलिदानातून दाखवून दिले. हा प्रेरणादायी इतिहास बेळगाव शहरात त्यांच्या स्मारकाच्या माध्यमातून कायमस्वरूपी जिवंत राहावा, यासाठी समिती प्रयत्नशील आहे.”

या सोहळ्याला नगरसेवक जयतीर्थ सौन्दती, सुनील जाधव, प्रसाद मोरे, श्रीनाथ पवार, निशांत कुडे, मारुती पाटील, यश पाटील, आदित्य पाटील यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य, महिला भगिनी आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

Tags: