बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील देशनूर गावात वाल्मीकी भवन निर्मितीच्या कारणावरून दोन समुदायांमध्ये तीव्र संघर्ष झाला आहे. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका कुटुंबावर जमावाने भीषण हल्ला चढवल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बैलहोंगल तालुक्यातील देशनूर गावात वाल्मीकी भवन निर्मितीच्या विषयावरून दोन गटात वाद झाला. वाल्मीकी पुतळ्याच्या सर्वेक्षण कामाला सदाशिव भजंत्री यांच्या कुटुंबाने विरोध केल्याने संतापलेल्या शेकडो लोकांनी त्यांच्या घरावर अचानक दगडफेक केली. संक्रांतीच्या सणामुळे घरात स्वयंपाक सुरू असतानाच हा हल्ला झाला असून, हल्लेखोरांनी घराचे छप्पर, शौचालय आणि घरातील वस्तूंची नासधूस केली. हातात दगड आणि लाठ्या घेऊन महिलांसह अनेकजण हल्ला करत असल्याची दृश्ये मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
या हल्ल्यामुळे घाबरलेल्या सदाशिव यांच्या कुटुंबाने घराचे दरवाजे लावून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी दरवाजे तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला असून या संघर्षात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.
संबंधित व्यक्तींनी बेकायदेशीर जागेवर अतिक्रमण केले असून २००८ पासून वाल्मीकी समाजावर अन्याय केला जात आहे. सरकारी जागेवर वाल्मीकी मूर्तीची स्थापना करून ८ वर्षे झाली आहेत. ज्यांनी सुरुवातीला त्यांना बेकायदेशीरपणे घरे दिली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मल्लेष यांनी म्हटले.
वाल्मीकी भवनासाठी सर्वेक्षण सुरू असताना हा वाद झाला असून घराची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेचे व्हिडिओ तपासून दोषींवर पुढील कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी म्हटले.
जखमींना तात्काळ बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून नेसरगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Recent Comments