बेळगाव महानगरपालिकेच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी सुमारे दीड तास उशीर केल्याचा निषेध करत एका नगरसेवकाने सभागृहाच्या जमिनीवर बसून आंदोलन केले. महापालिकेत आयोजित बैठकीला अधिकारी वेळेवर उपस्थित न राहिल्याने लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय धोरणावर ताशेरे ओढले. या गोंधळामुळे महापालिका वर्तुळात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महानगरपालिकेत CITIIS 2.0 योजनेअंतर्गत विशेष सभा बोलावण्यात आली होती. मात्र, ही सभा नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने सुरू झाली. अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणाचा निषेध करत नगरसेवक शाहीद पठाण यांनी सभागृहाच्या जमिनीवर बसून धरणे आंदोलन केले. स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी लोकप्रतिनिधींच्या वेळेची किंमत ठेवत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
सभेला झालेल्या विलंबाबाबत अधिकाऱ्यांनी तात्काळ नगरसेवकांची माफी मागितली. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली. महापौर, आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर शाहीद पठाण यांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर बेळगाव शहर विकास प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर मंगेश पवार होते. व्यासपीठावर उपमहापौर वाणी जोशी, सभागृह नेते हनुमंत कोंगाली आणि महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. उपस्थित होते.


Recent Comments