विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी-आलमट्टी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या आवारात खाजगी शाळेच्या बसने पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोप्पळ येथील रहिवासी दुर्गप्पा दोडमणी असे जखमीचे नाव असून, या भीषण अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत.

रस्त्याने चालत जात असताना शाळेच्या बसने दुर्गप्पा यांना जोरदार धडक दिली आणि बस त्यांच्या अंगावरून गेली. मात्र, बसच्या खालून लोळत बाहेर आल्याने दुर्गप्पा यांचे प्राण सुदैवाने वाचले. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हे दृश्य पाहून अंगावर काटा येतो. बस अंगावरून गेल्यानंतरही दुर्गप्पा जिवंत राहिल्याने याला दैवी चमत्कार मानले जात आहे.
जखमी दुर्गप्पा यांच्यावर सध्या बसवनबागेवाडी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बसवनबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. शालेय वाहनांच्या वाढत्या वेगावर आणि चालकांच्या निष्काळजीपणावर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून कडक कारवाईची मागणी केली आहे.


Recent Comments