Belagavi

बेळगावात डॉक्टरच्याच घरात सापडला गांजा

Share

एका डॉक्टरच्या घरातून बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला १३४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी संबंधित डॉक्टरला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.

बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना या धक्कादायक कारवाईची माहिती दिली. राहुल बंटी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. त्याने आपल्या घराच्या बेडरुममध्ये गांजा लपवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे माळमारुती पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला असता, तिथे १३४ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी त्वरित तो मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

एका जबाबदार व्यवसायात असलेल्या डॉक्टरकडे अशा प्रकारे अमली पदार्थ सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हा गांजा त्याने कोठून आणला होता आणि तो स्वतःसाठी वापरत होता की त्याची विक्री करत होता, या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू आहे.

Tags: