महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ‘गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग’ ही संकल्पना अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. राजाजीनगर येथील श्रीराम मंदिर मैदानावर महिला विकास महामंडळातर्फे आयोजित ‘कर्मणी उत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.


बेंगळुरू येथे बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले की, गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांनी डिजिटल मार्केटिंग सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. ही प्रणाली विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदान ठरणार असून, भविष्यात या ॲपच्या वापराबाबत सविस्तर कार्यशाळा आयोजित केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

काँग्रेस पक्ष सत्तेवर येतो तेव्हा नेहमीच महिलांच्या हिताच्या योजनांना प्राधान्य दिले जाते आणि अंगणवाडी केंद्रांच्या स्थापनेपासून सरकारने महिला व बालकांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी महामंडळाच्या अध्यक्षा जी. पद्मावती यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, राजकारणात महिलांचा सहभाग कमी असतानाही पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून येणे ही मोठी कामगिरी असून त्यांच्या कार्यकुशलतेमुळे महिला सक्षमीकरणाच्या कामाला मोठी गती मिळत आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘कर्मणी उत्सव’ आणि ‘गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग’ सुविधेचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला असून या निमित्ताने महामंडळाच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशनही पार पडले.

या सोहळ्याला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री रामलिंगा रेड्डी, विधान परिषद सदस्य पुट्टण्णा, महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा जी. पद्मावती, चित्रपट अभिनेत्री रागिणी द्विवेदी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक महेश बाबू, मंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी बी. एच. निश्चल आणि महिला व बालविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments