Belagavi

बेळगाव राज्योत्सवासाठी सरकारने ५० लाख रुपयांचा निधी केला मंजूर

Share

कर्नाटक राज्योत्सवासाठी सरकारकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीच्या विनियोगाबाबत आज बेळगाव महानगरपालिकेत कन्नड संघटनांची बैठक पार पडली.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कार्यक्रमांच्या रूपरेषेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी विशेष लक्ष घालून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो आज महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या निधीचा वापर करून बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. २० जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे आयुक्त कार्तिक एम. यांनी बैठकीत स्पष्ट केले.

यावेळी बोलताना कन्नड क्रियाशील समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी सीमाभागातील नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देऊन निधी मंजूर केल्याबद्दल पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांचे आभार मानले. २० जानेवारीपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत कोणत्या प्रकारचे कार्यक्रम राबवावेत, याबद्दल कन्नड संघटनांनी आपल्या सूचना मांडल्या असून जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे अशोक चंदरगी यांनी म्हटले आहे.

या बैठकीला कन्नड आंदोलक दीपक गुडगनट्टी, सुरेश गवन्नवर, महादेव तलवार, उपायुक्त उदयकुमार तलवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सीमाभागात कन्नड संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हा निधी अत्यंत मोलाचा ठरेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Tags: