बेळगाव शहरातील संगमेश्वर नगर येथील महापालिकेची १४ गुंठे जागा बंजारा समाज भवनासाठी तातडीने मंजूर करावी, या मागणीसाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने बेळगावचे महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या व्याप्तीत सुमारे २५ ते ३० हजार बंजारा समाज बांधव अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. यापूर्वी याच जागेवर ‘कर्नाटक राज्य तांडा विकास निगम’च्या वतीने ३ कोटी रुपये खर्चून समाज भवन उभारण्यासाठी भूमिपूजनही करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे मंजूर झालेला ३ कोटींचा निधी शासनाकडे परत जमा झाला. यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव शहरात मोठ्या संख्येने राहत असूनही बंजारा समाजाला अनेक शासकीय सवलतींचा लाभ मिळत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. स्वतःचे समाज भवन नसल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक बैठकांसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे पूर्वी निश्चित केलेली १४ गुंठे जागा अधिकृतपणे समाजाच्या ताब्यात देऊन रखडलेला प्रकल्प पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिवानंद चव्हाण, शरद पवार, प्रकाश राठोड, सुरेश लमाणी, लोकेश राठोड, अर्जुन राठोड यांच्यासह समाजाचे इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरांनी या विषयावर सकारात्मक विचार करून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.


Recent Comments