DEATH

काकतीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Share

बेळगाव-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर काकती गावाच्या हद्दीतील पौर्णिमा बारसमोर ६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून पोलीस सध्या मृताच्या वारसदारांचा शोध घेत आहेत.

अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील या अज्ञात व्यक्तीला वेगाने आलेल्या एखाद्या वाहनाने धडक दिली असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएनएस व मोटार वाहन कायद्यांतर्गत पोलीस अधिक तपास करत आहेत.

मृत व्यक्ती साधारण ५ फूट ५ इंच उंचीची असून तिचा वर्ण गव्हाळ आहे. मृताला काळी दाढी आणि सुमारे ३ इंच लांब केस आहेत. या व्यक्तीने अंगात काळ्या ठिपक्यांचा फुल शर्ट आणि राखाडी रंगाची जीन्स घातली आहे. विशेष म्हणजे मृताच्या उजव्या हातावर कानडी भाषेत ‘वसंत’ असे नाव गोंदलेले असून उजव्या हाताचा अंगठा जन्मापासूनच नाही. गळ्यात काळा दोरा आणि गदेचे लॉकेट असून डाव्या हातात सोन्याच्या रंगाची अंगठी आणि उजव्या हाताला राखी आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणालाही माहिती असल्यास त्यांनी बेळगाव शहर पोलीस नियंत्रण कक्ष किंवा काकती पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: