बेळगाव शहरात सुरू असलेल्या बहुकोटी खर्चाच्या उड्डाणपूल कामाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर सर्कल येथील पार्किंग व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.


उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या गंभीर होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुख्य चौक आणि रस्त्यांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यांवर कुठेही अस्ताव्यस्त पार्किंग होणार नाही याची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या.
रस्त्याच्या कडेला असलेली पार्किंग व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासोबतच वाहनचालकांच्या माहितीसाठी स्पष्ट फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments