बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात आज दुपारी भीषण बॉयलर स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य आठ कामगार गंभीररीत्या होरपळले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुरकुंबी येथील विक्रम इनामदार यांच्या मालकीच्या साखर कारखान्यात दुपारी २ च्या सुमारास काम सुरू असताना अचानक बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, बॉयलरमधील उकळते पदार्थ अंगावर पडल्याने कामगार पूर्णपणे होरपळले गेले. या दुर्घटनेमुळे कारखाना परिसरात एकच घबराट पसरली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमी आठ जणांपैकी एकाला बैलहोंगल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या अन्य सहा जखमींना तातडीच्या उपचारासाठी ‘झिरो ट्रॅफिक’च्या मदतीने बेळगावमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बॉयलर स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, तांत्रिक तपासानंतर वस्तुस्थिती समोर येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक रामराजन यांनी दिली आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी कारखाना परिसरात बंदोबस्त तैनात केला असून अधिक तपास सुरू आहे.


Recent Comments