बेळगाव डीसीसी बँक युनियनच्या अध्यक्षांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आमदार लक्ष्मण सवदी आणि त्यांचा मुलगा चिदानंद सवदी यांच्या विरोधात डीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर एकत्र जमलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी सवदी पिता-पुत्राच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

बँकेच्या कामकाजात व्यत्यय येऊ नये याची काळजी घेत, अर्ध्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावली तर उर्वरित अर्ध्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. “जर हल्ला झालाच नाही, तर आमदार सवदी यांनी त्यांच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे,” असे थेट आव्हान कर्मचाऱ्यांनी दिले आहे. सवदींनी केलेले सर्व आरोप खोटे असून आम्ही पुराव्यासह या लढाईत उतरलो आहोत, असेही कर्मचाऱ्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांना निवेदन देऊन सवदी यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली. माफी न मागितल्यास संपूर्ण राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर आंदोलकांनी भव्य रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.


Recent Comments