Belagavi

‘महांतेश कवटगीमठ ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ

Share

बेळगावमध्ये आज ‘महांतेश कवटगीमठ ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचा दिमाखात शुभारंभ झाला. शहरातील सरदार मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन महापौर, आमदार आणि विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार अभय पाटील, भाजप शहराध्यक्षा गीता सुतार, महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजीराव सुंठकर यांच्यासह अनेक नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. बेळगावमधील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक असून, यातून नवीन प्रतिभा समोर येईल, असे प्रतिपादन महापौर मंगेश पवार यांनी केले.

क्रिकेट हा बेळगावमधील प्रत्येकाचा आवडता खेळ आहे. महांतेश कवटगीमठ यांनी या खेळाला प्रोत्साहन देऊन स्पर्धा भरवली आहे, असे सांगत आमदार अभय पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा स्पर्धा शहरात सातत्याने व्हायला हव्यात, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

बेळगावचे सरदार मैदान हे क्रिकेट प्रेमींचे मुख्य केंद्र आहे. आगामी काळात मुंबई, गोवा यांसारख्या ठिकाणाहूनही खेळाडू येथे खेळण्यासाठी येणार आहेत. बेळगावचे क्रिकेटपटू भविष्यात भारतीय संघात चमकताना दिसावेत, अशी अपेक्षा माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केली. स्पर्धेचा पहिला सामना नगरसेवक आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या संघात पार पडला.

Tags: