Savadatti

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यल्लम्मा डोंगरावर भाविकांचा महापूर

Share

सवदत्ती यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी भरणाऱ्या यात्रेसाठी शुक्रवार सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी लांबच लांब रांगा लावल्या असून अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दर्शन सुरू आहे.

सालाबादप्रमाणे पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना आवश्यक त्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन आणि यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार असून शनिवारी सकाळपर्यंत संपूर्ण परिसर भाविकांनी गजबजून जाईल.

डोंगराकडे जाणारे उगार, जोगुळभावी आणि सवदत्ती सूत गिरणी या मार्गांवर वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. अनेक भाविक रस्त्याच्या कडेला निवासासाठी उतरले असून यात्रेदरम्यान सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून डोंगरावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ४०० होमगार्ड तैनात करण्यात आले असून संपूर्ण यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी चार वॉच टॉवरची उभारणी करण्यात आली आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दोन वेळा आढावा बैठका घेतल्या असून या यात्रेला प्रामुख्याने महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. यावर्षी १० लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून त्या सर्वांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

Tags: