Belagavi

के. रामराजन यांनी स्वीकारला बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार

Share

बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून के. रामराजन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला मुक्त न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.

बेळगाव हा मोठा जिल्हा असून सरकारने दिलेली ही जबाबदारी आपण पूर्ण निष्ठेने पार पाडू, असे त्यांनी यावेळी नमूद केले. आपल्या अनुभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, २०१८ मध्ये प्रशिक्षणासाठी त्यांनी बेळगावला भेट दिली होती. यापूर्वी त्यांनी धारवाड येथे पोलीस उपायुक्त म्हणून काम केले असून जनतेशी संवाद साधण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील स्थानिक समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी मुक्त प्रवेश असेल, असे त्यांनी जाहीर केले. पोलीस ठाण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर तडजोड प्रकरण चालणार नाही. तसेच रीतसर गुन्हा दाखल केल्याशिवाय कोणालाही पोलीस ठाण्यात आणले जाऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. जनतेला पोलिसांची भीती वाटण्याऐवजी कायद्याबद्दल भीती वाटणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

गुन्ह्यांच्या तपासाला आपले प्रथम प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले. जे लोक कायदा हातात घेतील त्यांना कायद्यानुसार योग्य ती शिक्षा होईल, याकडे विशेष लक्ष दिले जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: