Athani

अथणी तालुक्यात गॅस सिलेंडरचा स्फोट ;पती-पत्नी गंभीर जखमी

Share

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हळ्याळ गावात गुरुवारी सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाच्या प्रचंड तीव्रतेमुळे घराच्या भिंती कोसळून ढिगाऱ्याखाली अडकल्याने घरातील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.

हळ्याळ येथील धनपाल कांबळे आणि अनसूया कांबळे हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाकासाठी गॅस पेटवण्यासाठी गेले असता अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की घराच्या भिंतींचे अक्षरशः तुकडे होऊन त्या कोसळल्या.

“गॅस पेटवत असतानाच अचानक मोठा आवाज होऊन हा स्फोट झाला,” अशी माहिती समोर आली आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या आणि जखमी झालेल्या कांबळे दाम्पत्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने अथणी येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: