बेळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २६ डिसेंबरपासून विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख इंद्रनील अणवेकर यांनी दिली.

बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या सोहळ्याची रूपरेषा मांडली. ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मँडोळी रोडवरील साईराज लॉन्स येथे होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार उज्ज्वल निकम मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू सी. एम. त्यागराज, दक्षिणचे आमदार अभय पाटील, उत्तरचे आमदार असिफ सेठ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. चंद्रहास अणवेकर असतील.
त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता ‘गोल्डन रिदम्स’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून, यामध्ये संस्थेच्या माजी शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. या सत्राला माजी आमदार संजय पाटील आणि वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनुमण्णवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर बेळगावच्या डीडीपीआय लीलावती हिरेमठ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.
२७ डिसेंबर रोजी टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस शाळेच्या आवारात माजी विद्यार्थी आणि पालकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. जुन्या आठवणींना उजाळा, विविध खेळ आणि संगीत संध्येने या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची सांगता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला एस. एम. देसाई, व्ही. एन. जोशी, सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. नवीन आर. शेट्टीगार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments