सरकारी निधीचा वापर केवळ समुदाय भवन किंवा जातीय मंदिरांच्या बांधकामासाठी न करता, त्यातील मोठा हिस्सा शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरावा. असे केल्यास शिक्षण अधिक मजबूत होईल आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल दिसून येतील, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी केले.


मंगळवारी काकती क्लस्टर स्तरावरील ‘कलिका हब्बा’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आमदार यादव पुढे म्हणाले की, “माझ्या निधीतून बेळगाव तालुक्यातील विविध शाळांना फर्निचर, अतिरिक्त वर्गखोल्या, स्मार्ट बोर्ड, संगणक आणि प्रोजेक्टर यांसारख्या सुविधा पुरवल्या आहेत. शिक्षकांनी या साधनांचा वापर करून मुलांना मूल्यधिष्ठित शिक्षण द्यावे. अभ्यासासोबतच मुलांच्या कलागुणांना वाव देणारे असे कार्यक्रम त्यांना भविष्यासाठी सक्षम बनवतात.”
यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तालुक्यातील शाळांना विशेष सुविधा पुरवल्याबद्दल मुख्याध्यापक बी. एन. मडीवाळर, अशोक खोत, किरण करंबळकर आणि एस. के. नायक यांच्या हस्ते आमदारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सरकारी शाळेतील मुलांना स्वखर्चाने विमान आणि रेल्वेची मोफत सहल घडवून आणणारे सोनट्टी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रकाश देयन्नवर यांचा आमदारांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी काकती ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, उपाध्यक्ष रेणुका कोळी, एसडीडीएमसी अध्यक्षा जमुना कोळी, सिद्रायी सुतार, सीआरपीएफ नीता यलजी यांच्यासह काकती क्लस्टरमधील विविध शाळांचे शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बी. एन. मडीवाळर यांनी स्वागत केले, शिवानंद तल्लूर यांनी सूत्रसंचालन केले तर महेश अक्की यांनी आभार मानले.


Recent Comments