Belagavi

कंग्राळी बुद्रुकमध्ये श्री कल्मेश्वर महिला हरिपाठ मंडळाचे थाटात उद्घाटन

Share

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे श्री कल्मेश्वर महिला हरिपाठ मंडळाचा उद्घाटन समारंभ अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. माडेदगे येथील ह.भ.प. बाळू धाकलू धामणेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून श्री कल्मेश्वर मंदिरापर्यंत भव्य दिंडी काढण्यात आली. अभंग आणि भजनांच्या गजरात संपूर्ण कंग्राळी गाव भक्तीसागरात न्हाऊन निघाले होते. या दिंडी सोहळ्याचे उद्घाटन ओमकार सोसायटीचे चेअरमन राजकुमार हणमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सरकारी मराठी शाळेच्या मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात ह.भ.प. कल्लाप्पा तवणप्पा पाटील यांच्या हस्ते हरिपाठ मंडळाचे उद्घाटन झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रामा पा. तारीहाळकर होते.

याप्रसंगी चंद्रकांत जयवंत कोंडुसकर यांनी ध्वजपूजन केले. ग्रामपंचायत अध्यक्षा रोहिणी नाथाबुवा यांनी घटपूजन, नाथाजी पाटील यांनी विठ्ठल-रखुमाई पूजन आणि मल्लाप्पा तळवार यांनी टाळपूजन केले. वीणा पूजन दत्ता पाटील, हार्मोनियम पूजन जयराम पाटील, मृदंग पूजन मल्लाप्पा पाटील तर तुळशी पूजन जनाताई बसरीकट्टी यांनी केले. मारुती महादेव मन्नोळकर आणि गोपाळ मारुती पाटील यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अशा शब्दांत उपस्थितांनी या भक्तीमय उपक्रमाचे कौतुक केले.

या सोहळ्याला भाऊराव पाटील, मोनाप्पा बसरीकट्टी, गजानन हर्जे, उमेश तानाजी पाटील यांच्यासह कंग्राळी बुद्रुक आणि परिसरातील शेकडो महिला व भाविक उपस्थित होते. हरिनाम गजराने या सोहळ्याची सांगता झाली.

Tags: