Belagavi

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन

Share

गोकाक तालुक्यातील हुलीकट्टी गावातील क्रशर कारखान्यामुळे शेती आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी क्रशरमुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याची भावना व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठवडाभरात हा क्रशर बंद करावा, अन्यथा शेतकरी स्वतः तो बंद करतील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच या क्रशरला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर लढा उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ऊसाच्या दराबाबत भूमिका मांडताना शेतकरी नेत्यांनी सांगितले की, ३५०० रुपये दरासाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. सरकारने मध्यस्थी करून ३३०० रुपये दर निश्चित केला असतानाही काही कारखाने केवळ ३२०० रुपये देत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश हैदर यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Tags: