बेळगाव येथील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुवर्ण महोत्सव वर्षाचे औचित्य साधून आज शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या पाच दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाचे दान देणाऱ्या या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त शनिवारी निघालेल्या या रॅलीने बेळगावकरांचे लक्ष वेधून घेतले.


शाळेच्या बँड पथकाच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत संस्थेचे विश्वस्त चंद्रहास अन्वेकर, इंद्रनील अन्वेकर, मानद अध्यक्ष व्ही. एन. जोशी, प्राचार्या नवीना शेट्टीगार यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी होते. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, जिजाऊ माता, राणी चेन्नम्मा, संगोळी रायण्णा, बाळ गंगाधर टिळक आणि मदर तेरेसा अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषेतील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले.

ही भव्य रॅली शाळा आवारातून सुरू होऊन मिलेनियम गार्डन, गोवा वेस, आरपीडी वृत्त आणि अनगोळ नाका या मार्गावरून मार्गस्थ झाली. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून फिरल्यानंतर रॅलीचा समारोप पुन्हा शाळा आवारात करण्यात आला. या सोहळ्यात मोठ्या संख्येने पालकही सहभागी झाले होते, ज्यामुळे सुवर्ण महोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला. ५० वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाचे दर्शन या रॅलीच्या माध्यमातून घडले.


Recent Comments