Belagavi

मुख्यमंत्र्यांकडून दिवंगत बी. शंकरानंद यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण

Share

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा विजयी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणाऱ्या दिवंगत बी. शंकरानंद यांच्या नूतन पुतळ्याला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज पुष्पार्पण करून अभिवादन केले.

प्रकृतीच्या कारणास्तव पुतळ्याच्या अनावरण समारंभाला उपस्थित राहता आले नसल्याने, मुख्यमंत्र्यांनी आज विशेष भेट देऊन या महान नेत्याला आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील एक प्रभावशाली नेते म्हणून बी. शंकरानंद यांची ओळख होती. त्यांच्या पुतळ्याच्या निमित्ताने युवा पिढीला त्यांच्या कार्याचा परिचय होईल. आगामी काळात जिल्ह्यामध्ये त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बी. शंकरानंद यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनप्रवासाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. या प्रसंगी कृषी मंत्री चेलुवरायस्वामी, मुख्य प्रतोद अशोक पट्टण, शताब्दी समितीचे अध्यक्ष प्रदीप कणागली, ‘बुडा’चे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: