महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे मालवण येथील चिवला बीचवर आयोजित सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या स्पर्धेत पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, गुजरात, गोवा आणि बेंगळुरू अशा विविध ठिकाणच्या सुमारे एक हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. बेळगावच्या मोहित राहुल काकतकर याने दोन किलोमीटरच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक आणि चषक आपल्या नावे केला.
इतर खेळाडूंनीही पाच, तीन, दोन आणि एक किलोमीटर अंतराच्या विविध वयोगटातील स्पर्धा चिकाटीने पूर्ण केल्या. यामध्ये पाच किलोमीटर स्पर्धेत स्मरण मंगळूरक – चौथा , किमया गायकवाड – चौथी , प्रसाद सायनेकर – सहावा आणि प्राची नाकाडी – आठवी या खेळाडूंनी यश मिळवले. दोन किलोमीटरमध्ये मोहित काकतकर प्रथम आला, तर अमूल्या केस्टिकर सातव्या आणि अथर्व अवस्थी आठव्या क्रमांकावर राहिले. एक किलोमीटर स्पर्धेत आरोही अवस्थी हिने चौथा, तर हर्षवर्धन कर्लेकर याने दहावा क्रमांक पटकावला. तसेच प्रजित मयेकर, वर्धन नाकाडी, आरुष पिसे, सुप्रीत चिगरे, आणिका बर्डे, आस्ता काकडे आणि द्विती राजगोळकर यांनी आपली स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
यशस्वी खेळाडूंना रोख रक्कम, पदक आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या खेळाडूंना एनआयएस प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, संदीप मोहिते, किशोर पाटील, सतीश धनुचे यांचे मार्गदर्शन, तर क्लबचे अध्यक्ष शीतल हुलभत्ते, अरविंद संगोळी, राजू मुंदडा आणि शुभांगी मंगळूरकर यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.


Recent Comments