Belagavi

अनुदानित शाळा-महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा सुवर्णसौधवर मोर्चा

Share

अखिल कर्नाटक अनुदानित शाळा महाविद्यालय कर्मचारी संघाच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सुवर्णसौधसमोर भव्य निदर्शने करण्यात आली. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले.

आंदोलक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडताना सांगितले की, अनुदानित कर्मचाऱ्यांच्या विनाअनुदानित काळातील सेवेचा विचार पेन्शनसाठी होणे आवश्यक आहे. १ एप्रिल २००६ पूर्वी नियुक्त होऊन नंतर अनुदानास पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनानुसार ही योजना तातडीने अमलात आणावी. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच अनुदानित कर्मचाऱ्यांनाही आरोग्य संजीवनी योजनेचा लाभ मिळावा आणि शाळांमधील रिक्त असलेली शिक्षक व शिक्षकेतर पदे त्वरित भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली.

यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आंदोलकांना दिलासा देताना स्पष्ट केले की, आमचे सरकार जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. अनुदानित कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.

या आंदोलनात जी. हनुमंतप्पा, रामू गुगवाड, एन. राजगोपाल, अब्दुल कादर मेणसगी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

Tags: