बेळगावमध्ये जेडीएसचे ज्येष्ठ आमदार जी. टी. देवेगौडा यांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना देवेगौडा यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून, उद्या आपण स्वतः सभागृहात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या चामुंडेश्वरी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. चामुंडेश्वरी मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून याच भागातून प्रतिनिधित्व करून सिद्धरामय्या यांनी उपमुख्यमंत्री आणि मंत्री म्हणून काम केले आहे, याची आठवण देवेगौडा यांनी करून दिली. मतदारसंघातील उपसा सिंचन प्रकल्पांना तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी आणि ‘ग्रेटर म्हैसूर’ प्रकल्पांतर्गत शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीवर असलेले सिद्धरामय्या लवकरच पूर्ण क्षमतेने कामावर परतणार असल्याने कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.



Recent Comments