Belagavi

ज्येष्ठ नागरिकांचे १६ डिसेंबरला सुवर्णसौधसमोर धरणे आंदोलन

Share

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी १६ डिसेंबर रोजी बेळगावच्या सुवर्णसौधसमोर भव्य धरणे सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अखिल कर्नाटक ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्याध्यक्ष बी.ए. पाटील यांनी दिली.

बेळगावच्या कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात ८० लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक असून, त्यांच्या आर्थिक सुरक्षा, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणासाठी हे धरणे आंदोलन केले जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना केंद्राकडून ५ हजार आणि राज्याकडून ५ हजार रुपये, अशी मिळून मासिक ₹१०,००० रुपये वृद्धापकाळ पेन्शन मिळावी. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि अर्थसंकल्प सादर करावा, सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उपचार विभाग असावा आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवासाची सोय मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

बी.ए. पाटील यांनी आरोप केला की, २००७ मध्ये लागू झालेल्या पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याण कायद्यातील मूलभूत सुविधा शासनाने १६ वर्षांनंतरही दिल्या नाहीत. “ज्येष्ठ नागरिक विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र गेल्या एका वर्षात त्यांनी याकडे लक्ष दिले नाही,” अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.

यंदाच्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या तारखेत बदल करणे आणि पुरस्कार वितरणात नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत संघटनेने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन १६ तारखेला सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत चालणार असून, सरकार ज्येष्ठ नागरिकांकडे करत असलेल्या दुर्लक्षाबाबत आगामी निवडणुकांपूर्वी जनजागृती करण्याचा हा कार्यक्रम आहे, असे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.

Tags: