हिवाळी अधिवेशन जसजसे जवळ येत आहे, तसतसे विरोधी पक्ष अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अधिवेशनात काँग्रेस सरकारला घेरण्याच्या तयारीत असलेल्या भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विजापूरमध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली काढून आव्हान दिले आहे.


राज्यात शेतकऱ्यांना पीक विमा, पीक नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच, मका खरेदी केंद्र सुरू करणे आणि तुरीला हमीभाव देण्याची मागणी करत शेतकरी सातत्याने सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा सरकारसाठी कोंडी निर्माण करणारा ठरत असून याच दरम्यान विजापूरमध्ये भाजप किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन भव्य ट्रॅक्टर रॅली काढली.
आमदार जनार्दन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक ट्रॅक्टरसह ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकवलेले कांदे, तुरीची झाडे आणि मका प्रदर्शित करून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार जनार्दन रेड्डी यांनी सरकारवर टीका केली. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ब्रेकफास्ट मीटिंग्जमध्ये वेळ वाया जात आहे आणि ते शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत नाहीत.” असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
या भाजप किसान मोर्चाने काढलेल्या ट्रॅक्टर आंदोलनात काँग्रेस नेत्यांच्या भोजनावळीच्या कोंबडीचा उल्लेख करणाऱ्या घोषणा घुमल्या. शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असताना, सरकार मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठीच्या ‘चढाओढी’त व्यस्त आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी बोलताना भाजप किसान मोर्चाचे राज्याध्यक्ष ए.एस. पाटील नडहळ्ळी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “मुख्यमंत्र्यांकडून कोंबडीचा खून झाला,” अशा घोषणा देऊन सरकारवर हल्लाबोल केला. “हे आंदोलन इथेच थांबणार नाही. जर सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढला नाही, तर हजारो ट्रॅक्टर घेऊन सुवर्णसौधला घेराव घालण्यात येईल.” असा इशाराही त्यांनी दिला.
एकूणच, पीक नुकसान भरपाई, मका खरेदी केंद्र सुरू न होणे, तुरीला हमीभाव न मिळणे आणि द्राक्ष पिकाचा विमा न मिळणे या कारणांमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. अधिवेशनाच्या वेळी याच मुद्द्यांचा वापर करून भाजप सत्ताधारी काँग्रेस सरकारला अडचणीत आणण्यास उत्सुक आहे.


Recent Comments