Belagavi

जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार

Share

बेळगाव मधील प्रख्यात जलतरण प्रशिक्षक उमेश जी. कलघटगी यांना कर्नाटक सरकारने प्रतिष्ठेचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या समारंभात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

क्रीडापटूंच्या विकासासाठी आणि जलतरण क्षेत्रात कलघटगी यांनी गेल्या २४ वर्षांपासून दिलेल्या असाधारण आणि आजीवन योगदानाची ही शासकीय स्तरावरची नोंद आहे.

कलघटगी यांनी ‘स्विमर्स क्लब बेळगाव’ आणि ‘अक्वेरिअस स्विम क्लब बेळगाव’ या संस्थांच्या माध्यमातून आपले जीवन दिव्यांग मुलांचे संगोपन आणि प्रशिक्षणासाठी समर्पित केले आहे. शारीरिकदृष्ट्या विकलांग, मतिमंद, दृष्टिहीन, कर्णबधिर आणि अनाथ मुलांना ते पूर्णपणे विनामूल्य जलतरण प्रशिक्षण, किट, वाहतूक आणि पौष्टिक आहार पुरवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत ९ हून अधिक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि शेकडो राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार झाले आहेत. या खेळाडूंनी एकूण ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय, तसेच हजारो राष्ट्रीय स्तरावरील पदके जिंकली आहेत.

कलघटगी यांच्या प्रशिक्षणाचा परिणाम म्हणून एक राष्ट्रपती पुरस्कार विजेते, चार एकलव्य पुरस्कार विजेते आणि एक कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार विजेतेही तयार झाले आहेत. याशिवाय, लंडनचा सर्वात लहान यशस्वी ‘चॅनल स्विमर’ अँड्र्यू स्कॉट पुरस्कार विजेत्यानेही त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. क्रीडा कामगिरीसोबतच, त्यांनी अनेक गरजू खेळाडूंना नोकरी मिळवून देण्यासाठीही मदत केली आहे. प्रशिक्षक असण्यासोबतच, कलघटगी स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. त्यांनी विविध जागतिक स्पर्धांमध्ये सहा वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Tags: