Belagavi

आमदार अभय पाटील यांच्या ‘ज्येष्ठ नागरिक मनोरंजन प्रांगणा’चे उद्घाटन

Share

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या डॉ. सी. प्रसन्नाकुमार ज्येष्ठ नागरिक मनोरंजन प्रांगणाच्या उद्घाटन समारंभ आज पार पडला.

बेळगाव येथील टिळकवाडी वॅक्सीन डेपोमध्ये उभारण्यात आलेल्या या मनोरंजन प्रांगणाच्या उद्घाटन समारंभाला महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, नगरसेवक गिरीश धोंगडी, राजू भातकांडे, नितीन जाधव, श्रीशैल कांबळे, नंदू मिरजकर, भारती गुरव, राम भंडारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन करून बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, वॅक्सीन डेपो असल्यामुळेच बेळगावला ‘ऑक्सिजन’ मिळत आहे. येथे विमानांची माहिती देणारे मनोरंजन आणि ज्ञानवर्धक ‘सिव्हिलायझेशन गॅलरी’ उभारली जात आहे. तसेच, ‘व्हिलेजेस ऑफ इंडिया’, ग्रामीण भारत आणि ‘आर्ट गॅलरी’ देखील येथे तयार करण्यात आली आहे.

यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत म्हटले की, “सध्याच्या सरकारने आम्ही सुरू केलेली कामे बंद केली आहेत. २०२८ मध्ये आमचे सरकार आल्यानंतर ती पुन्हा सुरू करू. तसेच, शिवचरित्रालाही विरोध करण्यात आला आहे. हे प्रांगण ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पूरक ठरेल.”

ज्येष्ठ नागरिक राम भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अर्धवट थांबलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले. त्यांनी बेळगावचा वॅक्सीन डेपो ‘ऑक्सिजन बँक’ बनल्याचे नमूद केले. भंडारी यांनी या उपक्रमाला विरोध करणाऱ्या काही घटकांवर टीका करत, “आमदार अभय पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि सर्वांनी या उपक्रमाची योग्य काळजी घ्यावी,” असे आवाहन केले.

ज्येष्ठ नागरिक भारती गुरव म्हणाल्या, “वॅक्सीन डेपोतील झाडे तोडून सिमेंटचे जंगल तयार केले जात असल्याची बातमी पसरवली गेली होती. मात्र, आमदार अभय पाटील यांनी येथे केलेले काम पाहून आनंद झाला असून, हे बेळगावच्या सौंदर्यासाठी एक नवीन पंख (तुरा) आहे. आयुष्याच्या सायंकाळी असलेल्या लोकांसाठी हे सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे ठिकाण बनले आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आणखी एका ज्येष्ठ नागरिकांनी आमदार अभय पाटील यांनी केलेल्या विविध विकासकामांची आणि मूलभूत सुविधांच्या सुधारणेची प्रशंसा केली. तसेच, त्यांनी पंतप्रधानांच्या ‘वंदना’ योजनेची अंमलबजावणी कर्नाटकातही करावी, अशी मागणी केली.

यावेळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि खेळांमध्ये ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेले दिसले.

Tags: