Belagavi

कराटे परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी मिळवला प्रतिष्ठेचा ब्लॅक बेल्ट

Share

बेळगाव येथील श्री सोमनाथ मंदिराच्या सभागृहात नुकतीच कराटे बेल्ट परीक्षा पार पडली.

या परीक्षेत एकूण ५५ ‘कलर बेल्ट’ कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. यातील विनायक दण्डकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या प्रदीप मारीगोंद्रा, प्रतीक्षा मारीगोंद्रा आणि वैष्णवी होणगेकर या तीन विद्यार्थ्यांनी ‘टॉप थ्री ब्लॅक बेल्ट’ पटकावत यश संपादन केले.

गेल्या सहा वर्षांपासून हे तिघेही विद्यार्थी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, मन्नूर, आणि श्री सोमनाथ मंदिर, तहसीलदार गल्ली येथील कराटे वर्गात नियमितपणे सराव करत होते. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विविध ठिकाणी पदके जिंकली आहेत. त्यांच्या या कठोर परिश्रमाबद्दल इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते त्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या तिन्ही ब्लॅक बेल्ट प्राप्त विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक विनायक दण्डकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बाळू गोरल, डॉ. प्रकाश राजगोळकर, कर्नल राज शुक्ला, महेश बामणे हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता काकतीकर तसेच प्रशिक्षक परशुराम काकतीकर, प्रभाकर किल्लेकर, निलेश गुरखा, हरीश सोनार, श्रेया येळूरकर, सिद्धार्थ तहसीलदार, सात्विक शानभाग, तेजस्विनी देसाई, धनविता कुलाल, अमिशा होणगेकर, श्रेया चौगुले, साहिल काकती, भरमा पाखरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

Tags: