Belagavi

बेळगावच्या एमएलआयआरसीतून ४८४ अग्निवीरांची दीक्षा परेड

Share

बेळगावच्या मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधून ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांच्या सहाव्या तुकडीतील ४८४ अग्नीवर जवानांचा दीक्षांत समारंभ पार पडला.

३१ आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एकूण ४८४ अग्निवीरांनी शपथ घेतली. अग्निवीरांच्या शपथविधी परेडची पाहणी मेजर जनरल हरी भास्करन पिल्लई यांनी केली. त्यांनी अग्निवीरांनी दर्शवलेल्या उत्कृष्ट शिस्तीची आणि कवायतींच्या उच्च दर्जाची प्रशंसा केली.

राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि पवित्र धर्मग्रंथांच्या साक्षीने अग्निवीरांनी निष्ठेची शपथ घेतली. अग्निवीरांचे पालक, रेजिमेंटमधील कार्यरत आणि निवृत्त सदस्य, बेळगाव येथील नागरिक, एनसीसी कॅडेट्स आणि विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा प्रभावी समारंभ पार पडला. अग्निवीरांनी अभिमानाने शपथ घेतल्यामुळे या समारंभाची शोभा आणखी वाढली.

शपथ घेतलेल्या नवीन अग्निवीरांना उद्देशून पाहणी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. भारतीय सेनेतील सर्वात जुन्या पायदळ रेजिमेंटपैकी एक असलेल्या एमएलआयआरसीच्या समृद्ध परंपरा आणि वैभवाची त्यांनी आठवण करून दिली. तसेच, सैनिकी जीवनात शिस्त आणि शारीरिक क्षमता याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. रेजिमेंटल सेंटरमध्ये दिलेल्या प्रशिक्षणावर त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि हे प्रशिक्षण या युवा सैनिकांना भविष्यातील कार्यांसाठी उत्कृष्ट आधार देईल, अशी शुभेच्छा त्यांनी दिल्या.

मेजर जनरल पिल्लई यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अग्निवीरांना पदके वितरित करण्यात आली. अग्निवीर सूरज मोरे याला प्रतिष्ठेचे ‘नाईक यशवंत घाडगे, व्ही.सी. पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘शराफत युद्ध स्मारक’ येथे पुष्पचक्र अर्पण करून समारंभाची सांगता झाली. त्यानंतर अग्निवीरांच्या पालकांना ‘गौरव पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले.

Tags: