Belagavi

बेळगावात वकील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Share

सध्याच्या स्पर्धात्मक युगात सर्वच क्षेत्रांमध्ये तीव्र चुरस असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा असून, विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून हा व्यायाम साधता येतो. त्यामुळे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे मत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नाईक यांनी व्यक्त केले.

बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वकील क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवारी युनियन जिमखाना मैदानावर भव्य स्वरूपात पार पडला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नाईक यांनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावून स्पर्धेला सुरुवात केली. यानंतर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नाईक, कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे उपाध्यक्ष वकील विनय मांगलेकर, कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य वकील के. बी. नाईक, वकील मगदूम आणि वकील कमलेश किवाड यांनी रोपाला पाणी देऊन स्पर्धेचे प्रतीकात्मक उद्घाटन केले.

यावेळी बोलताना उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी बार असोसिएशनच्या कार्याची आणि या उपक्रमाची प्रशंसा केली. “क्रिकेट स्पर्धा खेळाडूंना हार-जीतचा धडा शिकवते. या स्पर्धेदरम्यान सहकाऱ्यांच्या कुटुंबांची ओळख होण्याची संधी मिळते. तसेच, खेळामुळे नेतृत्व गुण विकसित होतात,” असे त्यांनी म्हटले.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नाईक यांनी ५२ वकील संघटनांच्या सदस्यांना एकत्र आणून बेळगाव वकील संघाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. “चार भिंतींच्या आत कागदपत्रे घेऊन वाद-प्रतिवाद करणारे वकील आज बॅट-बॉल घेऊन खेळायला मैदानात उतरले आहेत. क्रीडा भावना अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ खेळातच नव्हे, तर जीवनातही हार-जीतचा धडा खेळातून मिळतो,” असे ते म्हणाले.

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील बसवराज मुगळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर ज्येष्ठ वकील दिनेश पाटील यांनी बेळगाव बार असोसिएशनने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष वकील शीतल रामशेट्टी आणि सदस्य उपस्थित होते. वकील सुधीर सक्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जनरल सेक्रेटरी वकील वाय. के. दिवटे यांनी आभार प्रदर्शन केले. या उद्घाटन सोहळ्यात डॉ. रवी पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि वकील उपस्थित होते.

Tags: