बेळगावातील मल्लिकार्जुन नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. घरातील सर्व सदस्य विवाह समारंभासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली.

ही चोरी बेळगावातील मल्लिकार्जुन नगरच्या तिसऱ्या क्रॉसमध्ये राहणारे हरीश लच्चू शेट्टी यांच्या घरी झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. घरमालक हरीश लच्चू शेट्टी हे आपल्या कुटुंबीयांसह उडुपी येथील एका विवाह समारंभासाठी गेले होते. तसेच, त्यांचा मुलगाही रात्रपाळीवर कामासाठी घराबाहेर होता. घरात कोणीही नसल्याची खात्री होताच चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील मौल्यवान सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन त्यांनी पोबारा केला. सकाळी शेजाऱ्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ घरमालकांना याची माहिती दिली. हरीश शेट्टी हे बेळगावात परतल्यानंतरच चोरीस गेलेल्या वस्तूंचे नेमके मूल्य किती आहे, हे स्पष्ट होईल.याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आहेत.


Recent Comments