Belagavi

अतिवाड-बेक्किनकेरेच्या विद्यार्थ्यांचे बससाठी बेळगावात आंदोलन

Share

योग्य आणि वेळेवर बससेवा मिळत नसल्यास उचगाव मुख्य रस्ता बंद करून आंदोलन करण्याचा इशारा बेळगाव तालुक्यातील अतिवाड-बेक्किनकेरे गावातील विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आज बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात बेळगाव तालुक्यातील अतिवाड-बेक्किनकेरे गावातील विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले. योग्य बस सेवा न पुरवणाऱ्या परिवहन विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आपला तीव्र असंतोष व्यक्त केला.

सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अतिवाड-बिक्किनकेरे येथे येणारी कर्नाटक परिवहन महामंडळाची बस नियमितपणे सेवा देत नाही. यामुळे कामावर जाणारे ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर वर्गात पोहोचणे गैरसोयीचे ठरत आहे. इतकेच नव्हे तर, सायंकाळीही योग्य बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री ८ वाजेपर्यंत घरी पोहोचण्याची परिस्थिती ओढावली आहे. आज आंदोलन करण्यासाठी आलो असता, ‘परत जा’ असे आम्हाला सांगण्यात आले, अशी नाराजी एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.

दरम्यान, परिवहन महामंडळ अतिवाड-बेक्किनकेरे येथे स्वच्छतागृहांसह मूलभूत सुविधा नाहीत, असे कारण देत आहे. मात्र, ग्रामस्थांनी पाण्याची व्यवस्था केली असून, ग्रामपंचायत इतर आवश्यक सुविधा पुरवत आहे. वारंवार विनंती करूनही परिवहन महामंडळ बससेवा देत नाही. बससेवा सुरू केली नाही, तर आम्हाला उचगाव मुख्य रस्ता बंद करून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे व्यंकटेश हेब्बाळकर यांनी दिला.

यावेळी अतिवाड-बिक्किनकेरेचे बहुसंख्य विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: