बेळगावच्या राणी चन्नम्मा मिनी प्राणिसंग्रहालयात एकूण ३१ काळवीट दगावली असून, हा रोग एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याला पसरणारा असण्याची शक्यता आहे. हा ‘कोरोना सदृश’ रोग असू शकतो, असा संशय वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

आज बेळगावच्या कुवेंपु नगर येथील त्यांच्या निवासस्थानी प्राणिसंग्रहालय विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी यांच्या नेतृत्वाखालील बैठक पालकमंत्र्यांनी घेतली. राणी चन्नम्मा मिनी प्राणिसंग्रहालयात एकूण ३१ काळवीट दगावल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती विचारली. काळविटांचा मृत्यू अत्यंत दुःखद असल्याचे सांगत, या गूढ मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी आणि काळविटांच्या संरक्षणासाठी तातडीने सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी वन अधिकाऱ्यांना दिले. प्राथमिक अहवालानुसार संसर्ग पसरल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणासंबंधी आलेल्या आरोपांची अत्यंत गंभीर दखल घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. ३१ काळविटांच्या मृत्यू प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच उर्वरित काळविटांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने लागू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
“वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे, अहवाल येणे बाकी आहे. रोग पसरला असावा, अशी भीती आहे. आज बंगळूरच्या बन्नेरघट्टाहून तज्ज्ञ डॉक्टर आले आहेत. डॉक्टरांनी अहवाल सादर केल्यावर सरकार आणि जिल्हा प्रशासन योग्य ती कारवाई करेल. सध्या एकाच ठिकाणी हे मृत्यू झाले आहेत. अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि विभागाकडून पुढील उपाययोजना केल्या जातील. मी आधीच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. हा एक नवीन रोग असल्यामुळे तो शोधणे कठीण जाऊ शकते,” अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी वन विभाग निगमच्या अध्यक्षांशी काळविटांच्या अकाली मृत्यूबाबत चर्चा केल्याचेही सांगितले. अध्यक्ष आल्यावर संध्याकाळी प्राणिसंग्रहालयाला भेट देणार असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.
यावेळी प्राणिसंग्रहालय विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी, डीएफओ, आरएफओ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments