Belagavi

बेळगावात आंतरराज्यीय कार चोराला अटक

Share

बेळगाव शहरातील महांतेश नगर परिसरात झालेल्या कार चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत माळमारुती पोलिस ठाण्यातील पथकाने एका आंतरराज्यीय चोराला अटक करून त्याच्याकडून चोरी झालेली क्रेटा कार जप्त करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि कार्यक्षमतेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या आरोपीला हैद्राबादमधून पकडण्यात आले असून, त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. दिनांक ०२-११-२०२५ रोजी बेळगावातील महांतेश नगर येथून क्रेटा कारची चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एसीपी मार्केट उपविभागाचे संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी.आर. गद्देकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.

तपास पथक तपासासाठी हैद्राबादला गेले असता, आंध्र प्रदेशातील एलुरु जिल्ह्यातील रहिवासी असलेला वीरा दुर्गाप्रसाद, पिता चिट्टबाबू (४७) या आंतरराज्यीय आरोपीला हैद्राबादच्या पेद्दंबरापेठ, हयात नगर येथे कारसह अटक करण्यात आली. आरोपीकडून सुमारे ₹७,७५,०००/- रुपये किमतीची क्रेटा कार जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी या चोरीतील आरोपीला न्यायालयासमोर हजर केले आहे. कार चोरी करण्यासाठी वीरा दुर्गाप्रसादसोबत बेळगावात आलेला त्याचा साथीदार संगेमु चक्रधर हा फरार झाला असून, त्याचा शोध घेण्याचे कार्य पुढे चालू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी माळमारुती पोलिस ठाण्याचे पी.एस.आय. होन्नप्पा तळवार, पी.एम. मोहित आणि कर्मचारी बी.एफ. बस्तवाड, अरुण कांबळे, जगन्नाथ भोसले, बी.एम. कल्लप्पणावर, के.टी. गौराणी, सी.जे. चिन्नाप्पागोळ, सी.आय. चिगरी, महेश ओडेयार, मल्लिकार्जुन गाडवी यांच्या प्रयत्नांची आणि योगदानाची प्रशंसा केली.

Tags: