



बेळगावातील शहापूर, नाथ पै चौकामध्ये असलेल्या पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात बुधवारी श्री काळभैरवनाथ जयंतीचा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी होम आयोजित करण्यात आला होता. यानंतर बुधवारी सकाळी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला, ज्याचा लाभ शहापूर, खासबाग, वडगाव आणि बेळगाव शहरातील हजारो भाविकांनी घेतला. श्री काळभैरव जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत कार्तिक दीपोत्सव सोहळाही मोठ्या उत्साहात साजरा झाला.
श्री काळभैरव जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते, तसेच गर्भगृहात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. जयंतीच्या दिवशी श्री काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात हजेरी लावली होती. हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या जयंती उत्सवाविषयी आणि श्री काळभैरवनाथ मंदिराच्या माहिती देताना, पत्रकार आणि मंदिर व्यवस्थापन मंडळाचे सल्लागार श्रीकांत काकतीकर म्हणाले की, हे श्री काळभैरवनाथ मंदिर केवळ बेळगाव शहरातच नव्हे, तर जिल्ह्यातही सर्वात प्राचीन श्री काळभैरव मंदिर आहे. “हे जागृत देवस्थान असल्याने दरवर्षी जयंती उत्सवाला बेळगाव आणि आसपासच्या भागातून हजारो भाविक हजेरी लावतात,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री काळभैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments