ऊस उत्पादकांना जाहीर झालेल्या आधारभूत किमतीच्या मागणीसाठी हत्तरगी टोल नाक्याजवळ शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात झालेल्या दगडफेक प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

गुरुवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चन्नगौडा ससाळट्टी (४०), प्रशांत मुगळी (२८), विनायक कोटीवाली (२५), मल्लप्पा घटगी (४६), शिवानंद वाणी (५९), सोमय्या हिरेमठ (४६) यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
हत्तरगी टोलजवळ झालेल्या या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. टोल गेटवर दगडफेक करणारे कोणीही शेतकरी नव्हते. ते फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालण्यासाठी आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
दगडफेक करणाऱ्या या समाजकंटकांना यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गत ७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती, ज्यात शेतकऱ्यांनी प्रति टन उसाला ३५०० रुपये दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. “यावेळी शेतकऱ्यांच्या वेशात येऊन पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. व्हिडिओ फुटेजच्या आधारे आम्ही सहा आरोपींना अटक केली आहे,” असे त्यांनी म्हटले.


Recent Comments