ऊस दराच्या निश्चितीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील लोकापूर येथे शेतकऱ्यांनी आज मोठा विजयोत्सव साजरा केला.

बागलकोट जिल्ह्याच्या मुधोळ तालुक्यातील लोकापूर येथे ऊस दराच्या निश्चितीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रति टन उसाला ३,३०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्काळ स्थगित केले.
या शुभ बातमीमुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्यांनी लोकापूरच्या ‘जगद्ज्योती बसवेश्वर चौकात’ फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. अनेक दिवसांपासून दर वाढीसाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. सकाळपासूनच बसवेश्वर चौकात जमलेल्या शेतकऱ्यांनी, जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला होता. याच दरम्यान त्यांनी बेळगाव-रायचूर आणि धारवाड-विजापूर या राज्य महामार्गांवर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. आता मुख्यमंत्र्यांनी दर जाहीर केल्यावर, शेतकऱ्यांनी ‘रस्ता रोको’ मागे घेतला असून, विजयोत्सवात ते मग्न झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण लोकापूरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Recent Comments