जातीय भेदभावाच्या परंपरेला धक्का देत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला साक्षी मानून बेळगावमध्ये एका आंतरजातीय विवाहाला मूर्त स्वरूप देण्यात आले. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या परंतु भिन्न जातींचे असल्याने कुटुंबीयांच्या विरोधाला सामोरे जाणाऱ्या एका जोडप्याने ‘युवा कर्नाटक भीमसेने’च्या मदतीने हा विवाह सोहळा पार पाडला.

बेळगाव येथील डॉ. आंबेडकर उद्यानात हा विवाह संपन्न झाला. सवदत्ती तालुक्यातील हिट्टणगी गावचा प्रवीण माळगी हा अनुसूचित जातीचा असून, कोप्पळ जिल्ह्यातील यलनुर्गा तालुक्यातील बसम्मा ही लिंगायत समाजाची आहे. गेली अनेक दिवस त्यांचे एकमेकांवर प्रेम होते, पण त्यांच्या लग्नामध्ये जात आडवी येत होती. यामुळे या प्रेमयुगुलाने बेळगावमधील युवा कर्नाटक भीमसेना संघटनेशी संपर्क साधला. दोघेही सज्ञान असल्याचे निश्चित झाल्यावर हा विवाह करण्यात आला.
या संदर्भात बोलताना जिल्हाध्यक्ष प्रवीण मादार यांनी, “या नवविवाहित जोडप्याला बेळगावच्या पोलीस अधीक्षकांनी मदत करावी,” असे आवाहन केले.
नवविवाहित दाम्पत्य बसम्मा आणि प्रवीण माळगी यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “आम्ही दोघे महान मानवतावादी आणि संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून, युवा कर्नाटक भीमसेनेच्या सहकार्याने आंतरजातीय विवाह केला आहे. आम्ही सुखी संसार करू. जातीयता जुन्या काळात होती. आता जातीपेक्षाही मानवता धर्म अधिक महत्त्वाचा आहे. आम्ही जातीय अडथळा झुगारून विवाह केला आहे, त्यामुळे आम्हाला आमचा संसार चालवण्यासाठी संधी द्यावी.”
यावेळी उद्यानात उपस्थित असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि लोकांनी नवदाम्पत्याच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या.


Recent Comments