Belagavi

जिल्हा फुटबॉल संघटनेच्या निवडणुकीच्या मागणीसाठी फुटबॉलप्रेमी रस्त्यावर

Share

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतील कथित गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी आणि जिल्हा संघटनेच्या निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी बेळगावमधील फुटबॉल क्लब्स, फुटबॉलप्रेमी आणि खेळाडूंनी आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

आज बेळगावमधील फुटबॉल क्लब्स, फुटबॉलप्रेमी आणि खेळाडू यांनी शहरातील राणी चेन्नम्मा चौकातून निषेध रॅली काढली आणि बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले.

बी.डी.एफ.ए. अध्यक्षांनी संघटनेच्या निधीमध्ये गैरव्यवहार केला असून, राज्य संघटनेने त्यांचे निलंबन करून पुनर्निवडणुकीचे आदेश दिले आहेत. तसेच, संघटनेच्या राज्य सचिवांनी स्वतः निधी काढल्याचे उघडकीस आले आहे. याव्यतिरिक्त जिल्हा संघटनेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास निलंबित करण्याची धमकी देखील दिली जात असल्याचा आरोप चौगुले फुटबॉल क्लबचे सचिव प्रणय शेट्टी यांनी केला.

यावेळी बोलताना माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या अधिकार दुरुपयोगाविरोधात के.एस.एफ.ए. राज्य संघटना यांच्याकडे तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. राज्य संघटनेने ५ जुलैपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तात्काळ निवडणुका घेऊन बेळगावमधील फुटबॉल खेळाडूंसाठी सामने आयोजित करण्यास सोयीचे करावे आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.

यावेळी बेळगावमधील फुटबॉल क्लब्स, फुटबॉलप्रेमी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: