Belagavi

ज्येष्ठ साहित्यिक शिरीष जोशी यांना राज्य चित्रपट अकादमीचा पुरस्कार

Share

ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी शिरीष जोशी यांना राज्य चित्रपट अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. म्हैसूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशालराज दिग्दर्शित ‘सावित्रीबाई फुले’ या चित्रपटातील संवादासाठी शिरीष जोशी यांना २०१८-१९ सालातील हा पुरस्कार मिळाला आहे. म्हैसूरच्या मुक्तगंगोत्री येथील दीक्षान्त समारंभ भवनात झालेल्या कर्नाटक चित्रपट अकादमीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ३ नोव्हेंबर रोजी त्यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखक पुरस्काराने सन्मानित केले.

शिरीष जोशी यांनी २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सावित्रीबाई फुले’ या चित्रपटासाठी संवाद लेखन केले होते. या पुरस्कारात १०० ग्रॅम चांदीचे पदक, स्मृतीचिन्ह, २० हजार रुपये रोख आणि पुरस्कार फलक यांचा समावेश आहे. डॉ. सरजू काटूर यांच्या ‘सावित्रीबाई फुले’ कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन विशालराज यांनी केले आहे, तर नागराज आदवाणी यांचे छायाचित्रण आहे. सतीश कुलकर्णी यांनी साहित्य पुरवले आहे. बेळगाव जिल्ह्यातील यादवाड येथील बसवराज भूथाळी या चित्रपटाचे निर्माते आहेत. यावेळी शिरीष जोशी यांनी या सर्वांचे सहकार्य कृतज्ञतेने नमूद केले.

बेळगावच्या रंगसृष्टीचे अध्यक्ष रमेश जंगल, उपाध्यक्ष एम. के. हेगडे, शैलेजा भिंगे, डॉ. रामकृष्ण मराठे आणि सर्व सदस्यांनी शिरीष जोशी यांचे अभिनंदन केले आहे. स्थानिक कलाकारांचा वापर करून बनवलेल्या या चित्रपटात उत्तर कर्नाटकातील अनेक नट-नट्यांनी अभिनय केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील पाच्छापूर, एलिमुनवळी, हुदली, गोकाक फॉल्स इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, हे यावेळी आठवण करून देण्यात आले.

Tags: