Belagavi

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘करवे’चा पाठिंबा

Share

उसाला ३,५०० प्रति टन दर निश्चित करावा, या मागणीसाठी मुडलगी तालुक्यातील गुर्लापूर क्रॉस येथे शेतकरी गेल्या सात दिवसांपासून करत असलेल्या अहोरात्र आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेने पाठिंबा दर्शविला आहे.

करवेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव सुवर्ण विधानसौधासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ अडवून आपला आक्रोश व्यक्त केला.

जिल्ह्यात सर्वत्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असून, बहुतांश तालुक्यांत दररोज निदर्शने होत आहेत. करवेचा नारायणगौडा गट या शेतकरी आंदोलनात उतरला असून, या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ अडवून रस्त्यावरच धरणे धरले. त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आंदोलक आणि पोलीस यांच्यात वादविवाद झाला.

संघटनेचे अध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले , “मुडलगी तालुक्यातील गुर्लापूर क्रॉस येथे शेतकरी गेल्या एका आठवड्यापासून उसाला प्रति टन ₹३,५०० हमीभाव मिळावा यासाठी अहोरात्र धरणे देत आहेत. मात्र, सरकार याला प्रतिसाद देत नाहीये. सरकारने आंदोलनाचे गांभीर्य ओळखून तात्काळ उसाला योग्य हमीभाव जाहीर करावा. शेतकरी आणि कन्नड समर्थक आंदोलक मोठे आंदोलन छेडण्यापूर्वीच सरकारने योग्य दर जाहीर करावा,” असा इशारा त्यांनी दिला.

महामार्ग रोखल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. शेकडो वाहने रस्त्यावर उभी राहिल्याने प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली. करवे कार्यकर्त्यांनी सर्व्हिस रोडवरही वाहने अडवून धरली आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Tags: